Thursday, May 13, 2010

पर्णकुटी ...

वात्सल्याच्या कुशीवरती अश्रू दोन ढळले
पर्णकुटीतल्या धुरात मायेला कोंब फुटले
निश्चल... काहीशा संदिग्ध मनी
मातृत्वाचे आभाळ रिते झाले |

छाया, सावली, सुहास्य काया
कधी निरपेक्ष ओझरता झरा तर
कधी प्रेमाचा रंजक, दुलई भोवरा
अवचित ढग दाटता - मनी निराशता,
तूच दाविला मज, तो शालीन किनारा |

नसेल जपली ओढ आंतरिक ?
केला नसेल का दुराग्रह ?
उभ्या अंगणी चांदणे शिंपित..
मजसाठी झाली कितीक सोशिक ?

कितीक रेषा अन कितीक बिंदू
तुटले जुडले आयुष्य आखताना..
सदैव भरविलास तो मोतियाचा दाणा
आसवांत तुझ्या अढळ मी -केवल एक शुक्रतारा |

"वेचायचे क्षण, बांधायची कमान " - तुझे शब्द


त्याच गर्तेत अजुनी वेचतो क्षण, सांडिले तव नयनी
तरी आस ती मनी, अपूर्ण जीवनी...
पुन्हा परतशील तू - त्या पर्णकुटीत आई ... ||


@ copyright - हर्षल