Friday, June 11, 2010

“गाभ्रीचा पाऊस”



महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय किंवा ती वर्तमानपत्रातील बातमी म्हणून आपणास नवीन काही नाही.पण या गंभीर विषयाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लावणारा गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट ठरू शकतो यात वाद नाही.उत्कुष्ट मांडणी, मोजके संवाद, परिपूर्ण मराठी नसली तरी आपली वाटणारी भाषा, उत्तम छायाचित्रण, सतीश मनवर यांचे दिग्दर्शन आणि कलाकारांनी दिलेली साथ या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
विदर्भातील शेतकरी किस्ना(गिरीश कुलकर्णी) आणि त्याचे कुटुंब यांची हि कथा.भरपूर कर्ज, वर्षानुवर्षे पाऊस नाही अशा काही अडचणींमुळे त्याचा शेजारी भास्कर देशमुख हा आत्महत्या करतो.शेती करण्याची आस आणि त्या आड येणारे सर्व प्रश्न यांनी वैफल्यग्रस्त होणार मन यामुळे किस्ना सुद्धा काही दिवसांनी असेच करेल का या भीतीने चिंतातूर झालेली त्याची आई, बायको अलका(सोनाली कुलकर्णी)आणि त्यांना साथ देणारा मुलगा दिनू (अमान अत्तार) हे सर्व कथासूत्र सांभाळतात.
भास्करची बायको अंजना(वीणा जामकर) हि आत्महत्येच्या आधीचे भास्करच एकट राहण, सतत विचार करण, शेतात दिवस दिवस नुसत बसून आकाशाकडे बघत राहण अशी काही लक्षणे सांगते आणि हा अनुभव पाठीशी बांधून किस्नाची बायको तिचा मुलगा दिनू याला रोज किस्ना बरोबर देखरेखीसाठी पाठवायला सुरुवात करते.दिनू रोज किस्ना कसा वागतो? कुठे जातो? विचार करतो का? काय? इत्यादी सर्वे लक्षणे सांगत खबरयाची भूमिका वठवतो.दिनू या कलाकाराचे काम, मुख्यतः त्याचे बोलके डोळे बरेच काही सांगून जातात.
पाऊस नाही पडला तरी किस्नाच मन सांभाळणारी, त्याने नाराज होऊ नये म्हणून सासूबरोबर वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधणारी, तिला अन् मुलाला रोज त्यावर पहार ठेवायला लावणारी, त्याच मन ओळखून सतत आशेचा किरण जागा ठेवून अगदी वेळेला स्वतचे सगळे दागिने विकणारी त्याची बायको सोनाली कुलकर्णीने योग्य निभावली आहे.तिची देहबोली अन् हावभाव फारच उत्तम.पण बरेचदा बोलताना काही शब्द, क्रियापदे सोडल्यास संवादात मराठी बाज जाणवतो. वैफल्यग्रस्त, एकाकी आणि घरची सर्व जबाबदारी सांभाळणारा किस्ना गिरीश कुलकर्णीने उत्तम साकारला आहे. त्याचे मुलाशी असलेले नाते, आईबरोबरचे संवाद आणि शेतात पाटलाला (मुकुंद वासुले) ठासून सांगितलेले शेती बद्दलचे विचार त्याने खऱ्या अर्थाने फुलवले आहेत. त्याचे मोकळे वावरणे, कधी वैफल्यग्रस्तता, घरातल्यांवरची चीडचीड इत्यादी मध्ये गिरीशची देहबोलीच खूप काही बोलून जाते.
पावसाची वाट पाहणाऱ्या किस्ना शेजारी झोपलेल्या दिनूने पाऊस अचानक आल्यावर, त्याची झोपमोड झाली म्हणून गाभ्रीचा पाऊस,गाभ्रीचा पाऊस म्हणून ओरडणे पण त्याचवेळी आपण काढलेल्या कर्जाचे चीज झाले या आनंदानी होणारा आनंद आणि मुलाने काढलेला अपशब्द न मानवलेला,त्याला ओरडणारा शेतकरी बाप, बायकोनी घरात खायला काही नसताना पुरणपोळी केल्यावरचे, अतोनात पाऊस पडल्यावरचे सीन चित्रपटात अजून रंग भरतात.चित्रपटात एकच गाणे आहे पण ते योग्य ठिकाणी असून ते योग्य परिणाम साधते.
आईच्या भूमिकेत ज्योती सुभाष यांनी सुंदर काम केले आहे.त्याची बोलण्याची ढब, मुलाशी असलेले नाते,त्याला शोधण्यासाठी केलेली पायपीट अन् त्यानंतर आई म्हणून समजावलेले शेती बद्दलचे अनुभव वजा विचार यांनी त्यांची व्यक्तिरेखा अजून फुलते. सोबतीला असलेले कलाकार - वीणा जामकर, तिचे सासरे, सावकार राजेश मोरे यांनीहि त्यांचे काम चोख केले आहे.
कलाकारांचे कमी पण योग्य धाटणीचे संवाद, विदर्भाचे साजेसे छायाचित्रण आणि विषयाची योग्य मांडणी यामुळे चित्रपट वेगळा ठरला आहे.चित्रपटाची गती जरी कमी असली तरी साधायचा तो योग्य परिणाम चित्रपट नक्की साधतो हे दिग्दर्शकाचे यश.
सध्या मराठीत उत्तम निर्मितीमूल्य आणि सशक्त कथा असलेले चित्रपट येत आहेत. श्वास, वळू, गंध, नटरंग, जोगवा, झिंग चिक झिंग हि काही नावे. उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, सतीश मनवर, नितीन नंदन यांसारख्या नवीन, वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शाकांमुळे नक्कीच सर्वस्तरीय प्रेक्षक आणि निर्माते मराठी चित्रपटांकडे वळतील यात शंका नाही.