Wednesday, August 11, 2010

की जूते कहा उतारे थे ...


छोटी छोटी चित्रायी यादें
बिछी हुई है लम्हों की
लॉन पर
नंगे पैर उनपर चलते चलते
इतनी दूर चले आये
की अब भूल गए है की
जूते कहा उतारे थे |

एडी कोमल थी,जब आये थे
थोड़ी सी नाज़ुक है अभी भी
और नाजुक ही रहेगी
इन खट्टी मीठी यादों की शरारत
जब तक इन्हें गुदगुदाती रहे |

सच भूल गए है
की
जूते कहा उतारे थे |

पर लगता है अब उनकी ज़रुरत नहीं !



-Favorite lines from movie Udaan 

Monday, August 9, 2010

उड़ान

जो लहरों से आगे नज़र देख पाती, तो तुम जान लेते मैं क्या सोचता हूँ
वो आवाज़ तुमको भी जो भेद जाती, तो तुम जान लेते मैं क्या सोचता हूँ
जिद का तुम्हारे जो पर्दा सरकता, तो खिडकियों से आगे भी तुम देख पाते
आँखों से आदतों की जो पलकें हटाते, तो तुम जान लेते मैं क्या सोचता हूँ

मेरी तरह खुद पर होता ज़रा भरोसा, तो कुछ दूर तुम भी साथ-साथ आते
रंग मेरी आँखों का बांटते ज़रा सा, तो कुछ दूर तुम भी साथ-साथ आते
नशा आसमान का जो चूमता तुम्हें भी, हसरतें तुम्हारी नया जन्म पातीं
खुद दुसरे जनम में मेरी उड़ान छूने, कुछ दूर तुम भी साथ-साथ आते |


-A nice poem from Movie Udaan

Friday, June 11, 2010

“गाभ्रीचा पाऊस”



महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय किंवा ती वर्तमानपत्रातील बातमी म्हणून आपणास नवीन काही नाही.पण या गंभीर विषयाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लावणारा गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट ठरू शकतो यात वाद नाही.उत्कुष्ट मांडणी, मोजके संवाद, परिपूर्ण मराठी नसली तरी आपली वाटणारी भाषा, उत्तम छायाचित्रण, सतीश मनवर यांचे दिग्दर्शन आणि कलाकारांनी दिलेली साथ या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
विदर्भातील शेतकरी किस्ना(गिरीश कुलकर्णी) आणि त्याचे कुटुंब यांची हि कथा.भरपूर कर्ज, वर्षानुवर्षे पाऊस नाही अशा काही अडचणींमुळे त्याचा शेजारी भास्कर देशमुख हा आत्महत्या करतो.शेती करण्याची आस आणि त्या आड येणारे सर्व प्रश्न यांनी वैफल्यग्रस्त होणार मन यामुळे किस्ना सुद्धा काही दिवसांनी असेच करेल का या भीतीने चिंतातूर झालेली त्याची आई, बायको अलका(सोनाली कुलकर्णी)आणि त्यांना साथ देणारा मुलगा दिनू (अमान अत्तार) हे सर्व कथासूत्र सांभाळतात.
भास्करची बायको अंजना(वीणा जामकर) हि आत्महत्येच्या आधीचे भास्करच एकट राहण, सतत विचार करण, शेतात दिवस दिवस नुसत बसून आकाशाकडे बघत राहण अशी काही लक्षणे सांगते आणि हा अनुभव पाठीशी बांधून किस्नाची बायको तिचा मुलगा दिनू याला रोज किस्ना बरोबर देखरेखीसाठी पाठवायला सुरुवात करते.दिनू रोज किस्ना कसा वागतो? कुठे जातो? विचार करतो का? काय? इत्यादी सर्वे लक्षणे सांगत खबरयाची भूमिका वठवतो.दिनू या कलाकाराचे काम, मुख्यतः त्याचे बोलके डोळे बरेच काही सांगून जातात.
पाऊस नाही पडला तरी किस्नाच मन सांभाळणारी, त्याने नाराज होऊ नये म्हणून सासूबरोबर वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधणारी, तिला अन् मुलाला रोज त्यावर पहार ठेवायला लावणारी, त्याच मन ओळखून सतत आशेचा किरण जागा ठेवून अगदी वेळेला स्वतचे सगळे दागिने विकणारी त्याची बायको सोनाली कुलकर्णीने योग्य निभावली आहे.तिची देहबोली अन् हावभाव फारच उत्तम.पण बरेचदा बोलताना काही शब्द, क्रियापदे सोडल्यास संवादात मराठी बाज जाणवतो. वैफल्यग्रस्त, एकाकी आणि घरची सर्व जबाबदारी सांभाळणारा किस्ना गिरीश कुलकर्णीने उत्तम साकारला आहे. त्याचे मुलाशी असलेले नाते, आईबरोबरचे संवाद आणि शेतात पाटलाला (मुकुंद वासुले) ठासून सांगितलेले शेती बद्दलचे विचार त्याने खऱ्या अर्थाने फुलवले आहेत. त्याचे मोकळे वावरणे, कधी वैफल्यग्रस्तता, घरातल्यांवरची चीडचीड इत्यादी मध्ये गिरीशची देहबोलीच खूप काही बोलून जाते.
पावसाची वाट पाहणाऱ्या किस्ना शेजारी झोपलेल्या दिनूने पाऊस अचानक आल्यावर, त्याची झोपमोड झाली म्हणून गाभ्रीचा पाऊस,गाभ्रीचा पाऊस म्हणून ओरडणे पण त्याचवेळी आपण काढलेल्या कर्जाचे चीज झाले या आनंदानी होणारा आनंद आणि मुलाने काढलेला अपशब्द न मानवलेला,त्याला ओरडणारा शेतकरी बाप, बायकोनी घरात खायला काही नसताना पुरणपोळी केल्यावरचे, अतोनात पाऊस पडल्यावरचे सीन चित्रपटात अजून रंग भरतात.चित्रपटात एकच गाणे आहे पण ते योग्य ठिकाणी असून ते योग्य परिणाम साधते.
आईच्या भूमिकेत ज्योती सुभाष यांनी सुंदर काम केले आहे.त्याची बोलण्याची ढब, मुलाशी असलेले नाते,त्याला शोधण्यासाठी केलेली पायपीट अन् त्यानंतर आई म्हणून समजावलेले शेती बद्दलचे अनुभव वजा विचार यांनी त्यांची व्यक्तिरेखा अजून फुलते. सोबतीला असलेले कलाकार - वीणा जामकर, तिचे सासरे, सावकार राजेश मोरे यांनीहि त्यांचे काम चोख केले आहे.
कलाकारांचे कमी पण योग्य धाटणीचे संवाद, विदर्भाचे साजेसे छायाचित्रण आणि विषयाची योग्य मांडणी यामुळे चित्रपट वेगळा ठरला आहे.चित्रपटाची गती जरी कमी असली तरी साधायचा तो योग्य परिणाम चित्रपट नक्की साधतो हे दिग्दर्शकाचे यश.
सध्या मराठीत उत्तम निर्मितीमूल्य आणि सशक्त कथा असलेले चित्रपट येत आहेत. श्वास, वळू, गंध, नटरंग, जोगवा, झिंग चिक झिंग हि काही नावे. उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, सतीश मनवर, नितीन नंदन यांसारख्या नवीन, वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शाकांमुळे नक्कीच सर्वस्तरीय प्रेक्षक आणि निर्माते मराठी चित्रपटांकडे वळतील यात शंका नाही.



Thursday, May 13, 2010

पर्णकुटी ...

वात्सल्याच्या कुशीवरती अश्रू दोन ढळले
पर्णकुटीतल्या धुरात मायेला कोंब फुटले
निश्चल... काहीशा संदिग्ध मनी
मातृत्वाचे आभाळ रिते झाले |

छाया, सावली, सुहास्य काया
कधी निरपेक्ष ओझरता झरा तर
कधी प्रेमाचा रंजक, दुलई भोवरा
अवचित ढग दाटता - मनी निराशता,
तूच दाविला मज, तो शालीन किनारा |

नसेल जपली ओढ आंतरिक ?
केला नसेल का दुराग्रह ?
उभ्या अंगणी चांदणे शिंपित..
मजसाठी झाली कितीक सोशिक ?

कितीक रेषा अन कितीक बिंदू
तुटले जुडले आयुष्य आखताना..
सदैव भरविलास तो मोतियाचा दाणा
आसवांत तुझ्या अढळ मी -केवल एक शुक्रतारा |

"वेचायचे क्षण, बांधायची कमान " - तुझे शब्द


त्याच गर्तेत अजुनी वेचतो क्षण, सांडिले तव नयनी
तरी आस ती मनी, अपूर्ण जीवनी...
पुन्हा परतशील तू - त्या पर्णकुटीत आई ... ||


@ copyright - हर्षल

Monday, April 19, 2010

' गजरा '.

दिव्यांचा झगमगाट.
रस्त्याचे आत्ताच कोन्क्रीटिकरण झाल्याने  गाड्यांची  रेलचेल  तशी  जोरात  होती.
घड्याळात सव्वा आठ.शुक्रवार असल्याने कंपनीतून घरी  जाणारे  पटकन  सिग्नल
मिळवून  पळ  काढण्याच्या घाईत, शेजारून जाणारया  सायकलस्वार आणि पादचार्यांचा 
विचार न करता गाड्या ताणत होते.

लाल दिवा लागला.क्षणार्धात नुसत्या एका लाल गोळ्याने सगळ्यांची गती मंदावून टाकली.
" दहा ला दोन , दहा ला  दोन...
गजरे घ्या गजरे ! "
बाजूच्या दुचाकी  वरील एका काकूंना पाहून मुलगा पुन्हा ओरडला ."घ्या ताई ."
त्यांनी नकारार्थी मान डोलवून सिग्नल चे कमी होणार्या अंकाकडेच बघण पसंत केल.

ह्या गजरेवाल्यांनाही  कळत असावं कि खरच कोण रसिक आहे ? शेजारी  अजून  एका  नवीन  मोपेडवर  एक  मुलगी  होती.
पण
त्याने  तिला  नाही  विचारलं  आणि या आजच्या हेल्मेटधारी पुरुषांना तर विचारण्याचा  प्रश्नच  नव्हता.
कितीही घ्यावासा वाटला तरी रस्त्यात इतक रसिक कोण होणार ?


'ग ज रा '.
नुसता शब्द उच्चारला तरी तो गंध जाणवतो. पांढरी शुभ्र फुले.मोहक सुवास.
मनास रंजकतेचा आभास...आणि त्या बरोबरच्या आठवणींचा उमाळा.
एका शब्दांनी किती शब्द जोडून येतात जणू फुलांची रासच त्या हिरव्या पानांच्या द्रोणातून अलगद झिरपावी !

या गजऱ्याच एक स्थान ठरलाय.किंवा लोक तसं मानतात तरी.पटकन असा कुणी- "काय रे शेवटचा गजरा बायकोला किंवा आईला कधी आणून
दिलास ? " असा प्रश्न विचारला तर पंचाईत होते. तसा तो नेहमी आणण हि जबाबदारी पुरुषांची होती. पण तो तीतक्याच नाजुकतेने माळण हि कला स्त्रीचीच .
पण सध्या हे घडण्याचे दोन्ही कडून प्रयत्न तसे दुर्मिळच होताना दिसतात. का आणि कशामुळे याबद्दल कोण सांगणार ?
शेवटी हा रसिकतेचा आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे असा म्हणून मी मुद्द्याला एक वेगळे वळणसुद्धा देऊ शकतो.पण ....

पण हि पळवाट काढून, मनात ' तो ' जपलेला ' गंध ' कसा लपवणार ?
' तो ' घरी जाऊन गजरा तिच्या केसात माळण्याची घाई कशी अन कुठे लपवणार ?
केसात माळताना पिन नाही म्हणून घरभर थुईथुई नाचणारी ती लहान कधी होणार ?

असे फक्त विचारच नाही तर पूर्ण क्षणांचा पसारा हा गजरा मनात टाकून स्वतः मात्र बहरून ऐट मिरवतो .
हल्ली तरी कुठे रोज हे गजरेवाले गजरे विकतात. सण - वार आले कि यांची किंमत वाढते.आणि मग लोक त्या दिवशी "साध्या फुलांचे दर तर 
अगदी एक लिटर दुधा एवढे झालेत म्हणून त्याही दिवशीहि ते घेण्याचे टाळतात."(जसे हे गजरे स्वस्त असताना रोज घरी न्यायचे.)


"अरे( पूर्वी अहो असायचं. असो. नो ऑब्जेक्शन. ) सिमीच लग्न आहे परवा.आमचा ग्रूप आणि तिची जर्मन बॉस पण येणार .We have decided sari theme forher marriage.
सो, तू जरा वीस गजरे घेऊन येशील."
....... .......
आता गजरे कुठे मिळणार ? म्हणजे ते अजून मिळतात ?
सध्याचा मोगरा हायब्रिड नसतो ना ? स्कीन वर काही side effects किंवा rashes ? हे असले याचे टेक्निकल-लोजिकल प्रश्न.
वाड्यात ज्या घरासमोर मोगर्याच झाड  होत ,सडा असा ओल्या मातीत निमुटपणे पडायचा ,
त्या वाड्याच हि आता टाऊनशिप झालेलं.(कदाचित म्हणून ? प्रश्न पुन्हा डोकावला ..)

आता हा कार रस्त्याच्या मध्ये थांबवून ट्राफिकला प्रोत्साहन देत जिथे नेमका तो मिळत नाही त्या एरीयात गजरा शोधणार .
एवढी रसिकता हि त्यालाही आधी होतीच कि !  कॉलेज मध्ये असताना कुणी एकाने लव्ह मैरेज बद्दल बोलले कि, कट्ट्यावर हा हि बोलायचा.
"बायको करीन ती अशी सांस्कृतिक ..गजरा आणीन मी अन माळीन पण मीच ."

स्वप्न बघण्यात काहीच चूक नसते आणि पूर्ण करण्यातही..
पण कट्ट्यावर ऐट मारून आज 12 वर्ष -जवळ जवळ एक तप उलटल होत .
मोगरा ,अबोली अन कर्दळीचे पान सुद्धा हल्ली दुर्मिळ संबोधले जात आहे हे तो भाऊगर्दीत विसरला होता .
ते तसे जपणारे तसे ' माळी ' पण हवेत !

त्याने पहिल्या पहिल्यांदा आणण्याचा गोड प्रयत्न केलेला .अगदी  माळण्याचा सुद्धा !! दोघ खूप मनमुराद हसलेली त्या क्षणी !
पण एक तप अहो .!.
ऑफिस मध्ये रोज आता गजरा घालून गेल तर ?
कॉर्पोरेट मध्ये रोज एक मीटिंग असते आता बॉस, क्लायंट US चे असतात .तिची तरी काय चूक ?
मुलीच्या गेंदरिंगला, देवीला वर्षातून एकदा भांडून का म्हणा जोडीने जाताना ती घालतेच कि.
फक्त ' तो ' आता पूर्वी सारखा आणून देत नाही .....  कदाचित त्याच्या मते त्याची बहुदा हि नैतिक जबाबदारी आता उरलेली नसावी .
मग तो नेमक्या या मुद्द्याने आपसूक उदासीन , अरसिक ठरला आणि नको त्यांना लावण्यवती असे म्हणू लागला .

पण त्याने आईला पहिला पगार झाल्यावर आणि बायकोला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलेला अबोली -मोगऱ्याचा गजरा आठवून आजही त्याच रुक्ष मन वेड होत .
मनाला ढोलकीने एकच नाद लावावा तास चित्त बेभान होऊन जात. खरंच !


' तो ' आणि ' ती ' .
रसिकता -अरसिकता या वयानुसार लोप पावणाऱ्या समजुती अजिबात नाहीयेत हेच विसरत चालले आहेत बहुतेक .
आत्ता आम्ही हे केल तर लोक काय म्हणतील ? आणि ' ती ' तरी तो गजरा माळून कुठे जाणारे आता ? असा म्हणून आवडीच्या फुलांचा गंध अजूनच दुर्मिळ करत आहेत.

तिथे तो ' रिक्षावालाच' हवा, जो रोज कितीही उन्हा-पावसात, धूळ उडवत गेला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमाने
रिक्षा पुसून लख्ख करून , कोमेजून जाण्याची भीती पुसून, पुन्हा वर आरशापाशी पुन्हा असा मोहक गजरा अडकवणारा !
अन मागच्या पेसेंजरच्या नवीन उत्साहाचे मीटर टाकणारा !

शेवटी फुल हि तेच आहे आणि गंध हि तोच ...
ओढ ठेवावी ती फक्त मोहकतेची , रंजकता जपण्याची ..





@ copyright  - हर्षल

Tuesday, April 6, 2010

आत्ताच झाडाचे एक साल गळून पडले...


आत्ताच झाडाचे एक साल गळून पडले...
 
इवल्याश्या पानांबरोबर विस्तीर्ण वृक्षालाही
हायसे वाटले ,
रम्य किनारी, समुद्रही खळखळून हसला  
...
मनाच्या उगवत्या कोपऱ्यात तो क्षण चिंब भिजला.

हे संपूच नये असे कधी वाटते
दाट धुक्यात मनच गांगरते .
पैलतीरी बसून उगाच मायेला कुरवाळते.

... भानावर येताच अवचित मनाला हसू फुटले
रेखीव छ्बीतही ' स्मित ' उमगले.
सरशी करून धावलो पकडण्यासाठी, सुगंध कस्तुरीचा
... हलकेच पुढे सरकले ' मृगजळ ' कोठडीत माझ्या .

गुंफुनी गीत संगे, वाहे बेभान हा वारा
घेउनी ध्यास चैतन्याचा, लागे तारुण्याचा लळा..
सांगा कुणीतरी -
"कसे लपवायचे चित्त-रंग-भावना ?
का माझ्यातालाच 'मी' रंगवण्याचा खेळ हा सारा ?
"

मीही थबकलो ..क्षणभर रुसलो.
झाडाचे सौंदर्या पाहून, त्याच ऋतूत मोहरलो .


नवे रूप घेऊन, वृक्ष सावलीत परतलो.
...भानावर येऊन झाडास ऐटीत मी बोललो -
" असशील तू कितीही जुना..आहे फक्त मीच नवा !"

पानांना मोकळीक देऊन झाडही उत्तरले
काही न बोलता एक 'साल' खाली टाकले.

आत्ताच झाडाचे एक साल गळून पडले...

@ copyright  -- हर्षल

Wednesday, February 24, 2010

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच
तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ...
भुकेल्या पोटी , बिन चहाच
काम कधी जमलच नाही..

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक,
रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत ..
त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.


पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट
पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही.
ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण
ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.


बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात
महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही.
जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही ,
कि कोणाचे हसू पाहवले नाही.


तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.


ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही .
घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही.
एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही.
स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद सुद्धा जोपासता आला नाही.


तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

आपण काय केले कि त्याने ते पुढे न्यावे?
तिने काय जपावे, जे आपण जोपासले?
मृग नक्षत्र पाहता पाहता ,कधी डोळे दिपले
तरी 'स्व' मला सापडायचा नाही.

@ copyright - हर्षल